२७ ऑगस्ट, २०१४

स्पंदन

या हवेतील धुंद गारवा, दवबिंदूतील मुग्ध गोडवा
चांदण्यांचे शुभ्र नूर, या ओठीचे शब्द-सूर
तुझ्याचसाठी, तुलाच अर्पण!

उन्हे भासती शीतल आज, लहरींची ये मधुर गाज
बकुळफुलाला मोहरण्याचा, घननिळ्यास त्या कोसळण्याचा
का हा होतसे मोह विलक्षण!

तुझ्याच ठायी जीव गुंतला, मनी रंगल्या स्वप्नशृंखला
सदैव आतुर तव नयनांचे, ओवीसम अन् मधुवचनांचे
माझ्या हृदयी, नित आवर्तन!

अशीच मंद झुळूक वाहावी, अशी छटा संध्येने ल्यावी
अंतराय मग विसरून जावे, लयीत एका ऐकू यावे
दो हृदयातून एकच स्पंदन!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा