२१ ऑगस्ट, २०१४

पदन्यास

शांत सांजवेळ, आसमंत सुना
ओढ लागे मना राधिकेच्या ।
Credits: http://themughalpaintings.blogspot.in

हरपले सूर मुरलीचे मंद्र
पुनवेचा चंद्र आसुसला ।

देही सौदामिनी, फुले कण कण
एक एक क्षण सोसवेना ।

सूर-तालावरी बेभान व्हावया
नर्तनासी काया अनावर ।

पैंजणांत तिच्या अशी रुणझुण
घुंगरांचे प्राण कंठी आले ।

परि स्तब्ध हवा, स्तब्ध पान फुल
यमुनेचे जळ संथ वाहे ।

झाले थिरकाया अधीर पाऊल
कसे ताल-बोल मुके झाले ।

पडेल का कानी वेणुचिया नाद
राधिकेची साद आर्त होई ।

घुमू लागे स्वर मुरलीचा मंद
करी राधा धुंद पदन्यास !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा