निभावून वाटेतले हेलकावे
किनार्यावरी नाव आता विसावे
उन्हामागुनी ये जसे चांदणे हे
असे शांत अल्वार आता जगावे |
कधी जाळतो यातनांचा निखारा
सुखाचा कधी शांतवी गार वारा
नवी वाट शोधून वाहे तरीही
तुझ्या जीवनाची अखंडीत धारा
प्रवासात या रंग न्यारे भरावे
पुन्हा एकदा तू नव्याने रमावे |
कधी पुस्तकांशी सुसंवाद व्हावा
कधी मैफिलीचाही आनंद घ्यावा
जगाची कधी तू करावी भ्रमंती
कधी स्वांतसौख्यास ही वेळ द्यावा
जगावे, पुन्हा एकदा तू जगावे
नव्या रंगगंधांसवे दर्वळावे |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा