आठवतं तुला?
ऐन तारुण्यात होतो मी, अन् तूही
काळ थबकला होता; जणू आपल्यासाठीच
आपण मात्र आकंठ बुडालो होतो प्रेमात..
पहिलंच प्रेम होतं तुझं, अन् माझंही.
आपल्या प्रेमपूर्तीनंतर ते तुझं भावविवश होणं..
आठवतं तुला?
आठवतात तुला?
आपण घेतलेल्या आणाभाका,
अन् सोबतीने केलेला आजवरचा प्रवास
जीव ओतून केलं हे सारं काही.
संसाराचा श्रीगणेशा करताना आले कसोटीचे कित्येक क्षण..
अशा वळणवाटांमधूनच तर शिकत गेलो, जगत गेलो.
कधी हसत, कधी बोचरं दुःख झेलत..
आठवतं तुला?
आठवतं तुला?
वडीलधारे काळाच्या पडद्याआड गेले,
नवीन जीव आयुष्यात आले,
अनेक स्थित्यंतरं पहिली आपण..
आयुष्याचे तुकडे कधी विखुरले, कधी जुळून आले
कधी आधार बनलो, कधी उन्मळून पडलो
एकमेकांना दुखावलंदेखील..
आठवतं तुला?
आठवतं तुला?
केवढं मोठ्ठं झाल्यासारखं वाटायचं, तिशी म्हणजे!
आता वळून पाहताना वाटतं,
एक पायरी होती ती फक्त
जिने आपल्याला इथवर आणून सोडलं..
या साऱ्या गतकाळाचा पुनःप्रत्यय घ्यायचा ठरवलं होतं आपण!
आठवतं तुला?
आठवतं तुला?
ठरवलं होतं आपण..
की आपल्या म्हातारपणी,
आपली पाखरं मोठी होऊन उडून गेल्यावर,
दुःख नाही; तर समाधान मानायचं ..
एक सुंदर आयुष्य मनसोक्त जगू शकलो याचं!!
आठवतं तुला...?