आसमंती रक्तिम्याची ओसरू लागे नशा
सावळीशी शाल घेती पांघराया या दिशा
सावळीशी शाल घेती पांघराया या दिशा
गर्द हिर्व्या पर्णवेली डोलती वाऱ्यावरी
श्यामवेळी पाखरे येती फिरूनी त्यावरी
नागमोडी वाट रंगे जांभळ्या रंगातुनी
सांडलासे रंग तोची दाट त्या छायांतुनी
दूर सीमा केशराची होऊ लागे शामला
माखु लागे काजळाने पर्वतांची शृंखला
नीलवर्णी त्या जलौघी चांद्रवर्णी झालर
पैलतीरी कातळी, प्राचीन शोभे मंदिर
भंगवी निःशब्दतेला स्वर्णघंटा मंदिरी
पूरियाचे रंग ल्याली कृष्णसंध्यासुंदरी!