टक्कर दे तू आयुष्याला पाय रोवूनि खंबीर रे!
जाण लढाई अस्तित्वाची टाकु नको धैर्याचा वसा
देवपणा ये दगडालाही घाव सोसता अविरत रे!
टक्कर दे तू आयुष्याला पाय रोवूनि खंबीर रे!
घेउनि जळती मशाल हाती अज्ञाताच्या वाटा तुडवी
अंधपांगळा भले जरीहि जो तो अपुले जीवन घड्वी
कुणा ना चुकली संसारी या संघर्षाची ज्वाला रे!
टक्कर दे तू आयुष्याला पाय रोवूनि खंबीर रे!
कशास सीमा क्षितिजापाशी? नक्षत्रांचा ध्यास हवा
दीप आशेचा उरी तेवता जन्माला ये अर्थ नवा
स्वप्न तेच साकार होई जे जागृत नयनी वसते रे!
टक्कर दे तू आयुष्याला पाय रोवूनि खंबीर रे!