दाटून येई अंधार
गहिरा हो आसमंत
ते झेलत टपोरबिंदु
डुलतो हळू प्राजक्त..
या वेड्या काजळवेळी
तव आठवणींचे पूर
पानांतुन ओल्या झरती
गर्भिचे अव्यक्त सूर..
क्षितिजाशी तेवे माझ्या
अंधूक एकटा तारा
आभास तिथे निळसर
अन् इकडे संततधारा..
पडद्याशी जळते ज्योत
पडद्यापलीकडे पाणी
फुलांतून प्राजक्ताच्या
नादतात सर्द विराणी..
पाऊस तिन्हीसांजेला
असाच बरसत राही
मातीत उमटती रेषा
अन् शुभ्रकेशरी काही!