असा कसा हा पाऊस, मुळी थांबता थांबेना
घरी लेकरू एकटे, करी कासावीस मना.
रेघ वीजेची कडाडे, आक्रंदती मेघ काळे
आठवणीने बाळाच्या, माझा जीव तळमळे.
अरे पावसा पावसा, असा नको होऊ क्रूर
घे क्षणाचा विसावा, घरी जाउ दे सत्वर..
-----------------------------------------
बा पावसा पावसा, कसा निश्टुर इतका
बाळ रडे पान्यासाठी, तेला उनाचा चटका.
भुई करपून गेली, पत्ते झाडाचे सुकले
पानी आनावे कुटुन, माजे आसू बी आटले.
आरं पावसा पावसा, माय पसरे पदर
जीव व्याकूळला तेचा, झणी कोसळू दे सर..