मराठी कविता व गीते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता व गीते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१३ जुलै, २०१६

Translation: Remember when (Alan Jackson)


आठवतं तुला?
ऐन तारुण्यात होतो मी, अन् तूही
काळ थबकला होता; जणू आपल्यासाठीच
आपण मात्र आकंठ बुडालो होतो प्रेमात..
पहिलंच प्रेम होतं तुझं, अन् माझंही.
आपल्या प्रेमपूर्तीनंतर ते तुझं भावविवश होणं..
आठवतं तुला?

आठवतात तुला?
आपण घेतलेल्या आणाभाका,
अन् सोबतीने केलेला आजवरचा प्रवास
जीव ओतून केलं हे सारं काही.
संसाराचा श्रीगणेशा करताना आले कसोटीचे कित्येक क्षण..
अशा वळणवाटांमधूनच तर शिकत गेलो, जगत गेलो.
कधी हसत, कधी बोचरं दुःख झेलत..
आठवतं तुला?

आठवतं तुला?
वडीलधारे काळाच्या पडद्याआड गेले,
नवीन जीव आयुष्यात आले,
अनेक स्थित्यंतरं पहिली आपण..
आयुष्याचे तुकडे कधी विखुरले, कधी जुळून आले
कधी आधार बनलो, कधी उन्मळून पडलो
एकमेकांना दुखावलंदेखील..
आठवतं तुला?

आठवतं तुला?
केवढं मोठ्ठं झाल्यासारखं वाटायचं, तिशी म्हणजे!
आता वळून पाहताना वाटतं,
एक पायरी होती ती फक्त
जिने आपल्याला इथवर आणून सोडलं..
या साऱ्या गतकाळाचा पुनःप्रत्यय घ्यायचा ठरवलं होतं आपण!
आठवतं तुला?

आठवतं तुला?
ठरवलं होतं आपण..
की आपल्या म्हातारपणी,
आपली पाखरं मोठी होऊन उडून गेल्यावर,
दुःख नाही; तर समाधान मानायचं ..
एक सुंदर आयुष्य मनसोक्त जगू शकलो याचं!!
आठवतं तुला...?


निभावून वाटेतले


निभावून वाटेतले हेलकावे
किनार्‍यावरी नाव आता विसावे
उन्हामागुनी ये जसे चांदणे हे
असे शांत अल्वार आता जगावे |

कधी जाळतो यातनांचा निखारा
सुखाचा कधी शांतवी गार वारा
नवी वाट शोधून वाहे तरीही
तुझ्या जीवनाची अखंडीत धारा
प्रवासात या रंग न्यारे भरावे
पुन्हा एकदा तू नव्याने रमावे |

कधी पुस्तकांशी सुसंवाद व्हावा
कधी मैफिलीचाही आनंद घ्यावा
जगाची कधी तू करावी भ्रमंती
कधी स्वांतसौख्यास ही वेळ द्यावा
जगावे, पुन्हा एकदा तू जगावे
नव्या रंगगंधांसवे दर्वळावे |

१६ जानेवारी, २०१६

सख्या रे..

तुझ्यामाझ्यात सख्या रे नाही अंतर उरले
माझ्या काळजाचे ठोके तुझ्या उरात वाजले

माझे मीपण सख्या रे गेले मला सोडुनिया
देह उपचारासाठी; मन तुझ्यात गुंतले

भूक तहान सख्या रे कशाचेच भान नाही
माझे जगणे मरणे तुझ्या प्राणाशी बांधले

माझ्या लोचनी सख्या रे तुझे सुहास्य निर्मळ
डोळां दिसेना काहीही; पाणी बरसू लागले

सदा हृदयी सख्या रे बोल तुझेच नादती
मीरेसम मन माझे तुझ्या रंगात रंगले


१० नोव्हेंबर, २०१५

!शुभ दीपावली!



                                 तेजोमय दीपज्योत
                                उजळता अंगणात
                                भिजो तिच्या किरणांत
                                अंतर्मन |


                                इवल्या पणती पोटी
                                वात तेवता गोमटी
                                चैतन्याचे मिळो दिठीं
                                वरदान |


                                होता तिमीर काजळी
                                प्रकाशून सोनसळी
                                भरो सौख्याने ओंजळी
                                चिरंतन |



                                || शुभ दीपावली ||



१० जुलै, २०१५

संध्यारंग




आसमंती रक्तिम्याची ओसरू लागे नशा
सावळीशी शाल घेती पांघराया या दिशा

गर्द हिर्व्या पर्णवेली डोलती वाऱ्यावरी
श्यामवेळी पाखरे येती फिरूनी त्यावरी

नागमोडी वाट रंगे जांभळ्या रंगातुनी
सांडलासे रंग तोची दाट त्या छायांतुनी

दूर सीमा केशराची होऊ लागे शामला
माखु लागे काजळाने पर्वतांची शृंखला

नीलवर्णी त्या जलौघी चांद्रवर्णी झालर
पैलतीरी कातळी, प्राचीन शोभे मंदिर

भंगवी निःशब्दतेला स्वर्णघंटा मंदिरी
पूरियाचे रंग ल्याली कृष्णसंध्यासुंदरी!







१२ जून, २०१५

स्मृती

नभोदरात गर्जती अशांत मेघ सावळे
इथे मनात माझिया तुझ्या स्मृतींचि वादळे!

क्षणात मौक्तिके खुळी विसावली कळ्यांवरी
कसे जुळून येति हे ऋणानुबंध आगळे!

उनाड वात वाहता उरामधून मातिच्या
थरारत्या हवेतुनी तुझाच गंध दर्वळे!

उधाणत्या सरींतुनी तुझे सुहास्य सांडले
भिजून चिंब जाहले तृषीत श्वास कोवळे!

अजाण ऊर्मि अंतरी तुझाच स्पर्श चेतवी
अनाम आर्त भाव हा तुला कळे मला कळे!

तनामनात ही अशी जणू सतार वाजते
तशात रम्य धुंद हा अखंड मेघ कोसळे!


३० मे, २०१५

|| अभंग ||

चित्त होय दंग दंग
सुखे गाय वो अभंग

फुटे टाहो अंग अंग
देवा तुजा लाभो संग

मती स्मृति ऐशा गुंग
देखी तुजे रूप, रंग

अता होवो गा निःसंग
वसो मनी पांडुरंग |


१६ एप्रिल, २०१५

टक्कर दे!

डरे, भेदरे, उगा थरथरे का शूरांचे अंतर रे?
टक्कर दे तू आयुष्याला पाय रोवूनि खंबीर रे!

का माघारी येसि परतून का नमते तू घेसि असा
जाण लढाई अस्तित्वाची टाकु नको धैर्याचा वसा
देवपणा ये दगडालाही घाव सोसता अविरत रे!
टक्कर दे तू आयुष्याला पाय रोवूनि खंबीर रे!

घेउनि जळती मशाल हाती अज्ञाताच्या वाटा तुडवी
अंधपांगळा भले जरीहि जो तो अपुले जीवन घड्वी
कुणा ना चुकली संसारी या  संघर्षाची ज्वाला रे!
टक्कर दे तू आयुष्याला पाय रोवूनि खंबीर रे!

कशास सीमा क्षितिजापाशी? नक्षत्रांचा ध्यास हवा
दीप आशेचा उरी तेवता जन्माला ये अर्थ नवा
स्वप्न तेच साकार होई जे जागृत नयनी वसते रे!
टक्कर दे तू आयुष्याला पाय रोवूनि खंबीर रे!


०९ मार्च, २०१५

दाटून येई..


दाटून येई अंधार
गहिरा हो आसमंत
ते झेलत टपोरबिंदु
डुलतो हळू प्राजक्त..

या वेड्या काजळवेळी
तव आठवणींचे पूर
पानांतुन ओल्या झरती
गर्भिचे अव्यक्त सूर..

क्षितिजाशी तेवे माझ्या
अंधूक एकटा तारा
आभास तिथे निळसर
अन् इकडे संततधारा..

पडद्याशी जळते ज्योत
पडद्यापलीकडे पाणी
फुलांतून प्राजक्ताच्या
नादतात सर्द विराणी..

पाऊस तिन्हीसांजेला
असाच बरसत राही
मातीत उमटती रेषा
अन् शुभ्रकेशरी काही!


०४ सप्टेंबर, २०१४

असे वेड..

असे वेड जीवास लावलेस तू,
अनोळखी झाले सारे रोजचे ऋतू

नवे गीतही आज कोकिळकंठी
नवे पहाटरंग अन् लागले फुटू

नभी उडे, कधी होई फुलपाखरू
पहा तोल या मनाचा लागला सुटू

असा दाटे उन्माद उरी, अंतरी
की वाटे, आज वाण आनंदाचे लूटू

रोमरोमांत असा भिनलास रे
मला व्यापूनीही, जरा उरलास तू..

२७ ऑगस्ट, २०१४

स्पंदन

या हवेतील धुंद गारवा, दवबिंदूतील मुग्ध गोडवा
चांदण्यांचे शुभ्र नूर, या ओठीचे शब्द-सूर
तुझ्याचसाठी, तुलाच अर्पण!

उन्हे भासती शीतल आज, लहरींची ये मधुर गाज
बकुळफुलाला मोहरण्याचा, घननिळ्यास त्या कोसळण्याचा
का हा होतसे मोह विलक्षण!

तुझ्याच ठायी जीव गुंतला, मनी रंगल्या स्वप्नशृंखला
सदैव आतुर तव नयनांचे, ओवीसम अन् मधुवचनांचे
माझ्या हृदयी, नित आवर्तन!

अशीच मंद झुळूक वाहावी, अशी छटा संध्येने ल्यावी
अंतराय मग विसरून जावे, लयीत एका ऐकू यावे
दो हृदयातून एकच स्पंदन!

२१ ऑगस्ट, २०१४

पदन्यास

शांत सांजवेळ, आसमंत सुना
ओढ लागे मना राधिकेच्या ।
Credits: http://themughalpaintings.blogspot.in

हरपले सूर मुरलीचे मंद्र
पुनवेचा चंद्र आसुसला ।

देही सौदामिनी, फुले कण कण
एक एक क्षण सोसवेना ।

सूर-तालावरी बेभान व्हावया
नर्तनासी काया अनावर ।

पैंजणांत तिच्या अशी रुणझुण
घुंगरांचे प्राण कंठी आले ।

परि स्तब्ध हवा, स्तब्ध पान फुल
यमुनेचे जळ संथ वाहे ।

झाले थिरकाया अधीर पाऊल
कसे ताल-बोल मुके झाले ।

पडेल का कानी वेणुचिया नाद
राधिकेची साद आर्त होई ।

घुमू लागे स्वर मुरलीचा मंद
करी राधा धुंद पदन्यास !

११ ऑगस्ट, २०१४

स्वप्ने पाहावी म्हणुनी

स्वप्ने पाहावी म्हणुनी, ठरवून झोपलो मी
स्वप्नांमधेही गर्द, अंधार पाहिला मी

  उडण्याची आस धरुनी, जमिनीस पारखा झालो
तरंगावयाचा व्यर्थ, केला प्रयत्न तरी मी

हिंडलो जगी जरी या, मिरवीत शत मुखवटे
आरशात उद्ध्वस्त माझे, खरे रूप पाहिले मी

मज कौतुकले जगाने, औषधास दुःख नाही!
बोचून शल्य मनीचे, रडलो पुन्हा पुन्हा मी

जरी गावयाचे होते, लयबद्ध आनंदगाणे
सूर माझ्याच अंतरीचे, शकलो न आळवू मी

उमजून चुकलो परी हे, मी एकला न जगती
ऐसी लक्ष माणसे बघुनी, माझे मलाच सावरले मी..

०२ ऑगस्ट, २०१४

टपरी

दोन क्षणांची
पहिली भेट
चहाच्या टपरीशी
धडकून थेट
                                    मग वादावादी
                                    छोटंसं भांडण
                                    शब्द प्रतिशब्द
                                    एकमेकांना आंदण
रोज तीच टपरी
रोज तीच वेळ
वाढलेल्या धडका
अन् जमलेला मेळ
                                    मग हळूहळू
                                    मुद्दाम वाट पाहणं
                                    एकच कटिंग चहा
                                    दोघांमधे घेणं
रंगलेल्या गप्पा
त्यात पावसाची भुरभुर
नंतर दिवसभर
राहणारी हुरहुर
                                    असाच एक दिवस
                                    टपरीपासचा, अधीर
                                    टळत गेलेली वेळ
                                    होत गेलेला उशीर
चुकामूक बहुतेक
स्वतःला समजावणं
पेल्यातला चहा
अर्धाच संपवणं
                                    एकट्याने चहा
                                    रोजचाच त्यानंतर
                                    टपरी बदलली?
                                    की वाढलं अंतर?
रोज तिथून जाताना
टाकलेला एक कटाक्ष
घडलेल्या भेटींची
टपरीच तेवढी साक्ष
                                    चुकामूकीचं अजूनही
                                    न कळलेलं कारण
                                    दोन महिन्यांची ओळख
                                    आयुष्यभराची आठवण.

Credits: mumbaithecityofdreamscometrue.blogspot.in

१९ मे, २०१४

पाऊस - दोन जगांतला

असा कसा हा पाऊस, मुळी थांबता थांबेना
घरी लेकरू एकटे, करी कासावीस मना.

रेघ वीजेची कडाडे, आक्रंदती मेघ काळे
आठवणीने बाळाच्या, माझा जीव तळमळे.

अरे पावसा पावसा, असा नको होऊ क्रूर
घे क्षणाचा विसावा, घरी जाउ दे सत्वर..

-----------------------------------------

बा पावसा पावसा, कसा निश्टुर इतका
बाळ रडे पान्यासाठी, तेला उनाचा चटका.

भुई करपून गेली, पत्ते झाडाचे सुकले
पानी आनावे कुटुन, माजे आसू बी आटले.

आरं पावसा पावसा, माय पसरे पदर
जीव व्याकूळला तेचा, झणी कोसळू दे सर..